नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा : पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-2021 अंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगीक तत्वावर ) या 8 फळ पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचित फळपिके घेणारे खातेदांराचे अतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत अर्ज करू शकतात. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरीक्त विमा संरक्षण देण्यात येत असून त्यासाठी अतिरीक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा असेल.
केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. संत्रा, मोसंबी पिकांसाठी उत्पादनक्षम वय 3 वर्ष, डाळिंब व द्राक्ष 2 वर्ष तर आंबा व काजूसाठी उत्पादनक्षम वय 5 वर्ष आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीस निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे, जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-2021 याहंगामा करिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
शेतकऱ्यांनी आंबिया बहार द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोबर, मोसंबी व केळी पिकासाठी 31ऑक्टोबर, संत्रा, काजू 30 नोव्हेंबर, आंबा व डाळिंब पिकासाठी 31 डिसेंबर तर स्ट्रॉबेरी पिकासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावयाचा आहे. शेतकऱ्यांनी अधिसूचीत फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करून विहित मुदतीत जवळच्या ई-सेवा केंद्र किंवा बँकेशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई टोल फ्री क्र. 1800116515, दूरध्वनी क्रमांक 022-61710912 ईमेल [email protected] वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.