नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत जिल्ह्याने नाशिक विभागात चांगली कामगिरी केली असून आतापर्यंत 15 लाख 67 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीतही जिल्ह्याने 53 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्याचे अभिनंदन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ऑनलाईन बैठकीत मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी पुढील टप्प्यातील नियोजनाची माहिती घेतली. सर्वेक्षणासोबत ऑनलाईन नोंदीदेखील वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ते म्हणाले, सर्वेक्षणात मागे पडलेल्या तालुक्यात आरोग्य पथकांच्या मदतीने आणखी पथक देण्यात यावेत. ऑनलाईन नोंदणीसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात यावी. धडगाव तालुक्याने अनेक अडचणी असताना सर्वेक्षण आणि ऑनलाईन नोंदणीचे चांगले काम केल्याचे ते म्हणाले.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात 9 ऑक्टोबरपर्यंत कोविड रुग्णालयासाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीचे काम पूर्ण करावे. कोरोना बाधित व्यक्तीच्या घराच्या परिसरातील किंवा त्या गावातील व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांचे स्वॅब त्वरीत घेण्यात यावे. अशा पद्धतीनेच ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रसार थांबविता येईल.
कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयाला अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात. खाजगी कोविड रुग्णालयात निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिकचे देयक देण्यात येत असल्यास त्वरीत कारवाई करण्यात यावी. रुग्णालयाना निर्धारीत मानकानुसार मुळ देयक देण्याच्या सुचना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.