नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील मौजे पळाशी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणी शिबीरात 242 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली.
तालुका प्रशासनातर्फे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी फिरत्या पथकाद्वारे अधिकाधिक स्वॅब तपासणीवर भर देण्यात येत आहे. पळाशी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने फिरत्या पथकाद्वारे स्वॅब तपासणी करण्यात आली.
डॉ.दिपाली पाडवी यांनी कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता 242 व्यक्तींचे स्वॅब घेतले. त्यांना डॉ.सतीश नांद्रे, डॉ.जितेंद्र सोनवणे, डॉ.योगेश पटेल, आरोग्य सेवक अमृता पाटील आणि श्री.खेडेकर यांनी सहकार्य केले. पळाशी येथील शिबिरासाठी ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल श्रीमती पंत यांनी ग्रामपंचायत व नागरिकांना धन्यवाद दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी फिरत्या पथकाद्वारे शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांना आपल्या गावात किंवा परिसरात स्वॅब तपासणी शिबीर आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. तसेच आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.