नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला भेट देऊन कालमर्यादेत आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, दररोज किमान 50 घरांना भेट देऊन माहिती ॲपवर अपलोड करावी. एका दिवसात साधारण 24 हजार कुटुंबांची माहिती संकलीत करावी. कोरोनासोबत इतर गंभीर आजाराबाबतही माहिती घेण्यात यावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना सर्वेक्षणात सहभागी करून घ्यावे.
स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. एखाद्या भागात बाधित व्यक्ती आढळल्यास लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन करून स्वॅब चाचणी करण्यात यावी. ग्रामीण भागात नागरिकांना पूर्वसूचना देऊन फिरत्या पथकाच्या सहकार्याने स्वॅब चाचणी करावी.
भाजीविक्रेते, हातगाडीवर व्यवसाय करणारे, आरोग्य कर्मचारी, दुकानदार आदींची चाचणी करून घ्यावी. संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. ग्रामीण भागात आवश्यकता असल्यास फिरत्या पथकांची संख्या वाढवावी. कोरोनाचे लक्षणे असलेल्यांची तपासणी वेळेवर होईल याची दक्षता घ्यावी. दररोज किमान 600 स्वॅब घेतले जातील याचे नियोजन करावे.
नवापूर, तळोदा आणि शहादा येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करून त्याची माहिती सादर करावी. प्रत्येक ठिकाणी 20 ते 25 बेड्सची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील म्हणाले, मोहिमेदरम्यान तापाच्या रुग्णांना संदर्भित करणे महत्वाचे आहे, तसेच त्यांचा स्वॅब वेळेवर घेण्याचे नियोजन करण्यात यावे. जनजागृतीवर अधिक भर द्यावा.
बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.