नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या नंदुरबार जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.
श्री.गमे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार या मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. मोहिमेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीक व अतिजोखमीच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला योग्य माहिती द्यावी आणि आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे.
कोरोनासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोना होऊच नये यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही व्यापक मोहिम हाती घेण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत नागरीकांचे प्रबोधनदेखील यावेळी करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरीकांनी मोहिमेत सहभाग घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभागीय आयुक्ताच्या हस्ते मोहिमेची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या टी शर्टचे विमोचन करण्यात आले.