नंदुरबार (प्रतिनिधी) :– येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण व सोबतच्या एका नातेवाईकास पुरविण्यात येत असलेल्या आहार खर्चात जास्तीची बिले काढत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले असून, याबाबत श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक या संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ शिवराम भोये, व्हा. चेअरमन काशिनाथ माधव ढोमसे, संस्थेचे प्रतिनिधी शरद बाळासाहेब देवरे व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरुद्ध आरटीआय कार्यकर्ते भरत देशमुख यांनी पुराव्यानिशी तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर असे कि, जिल्हा रुग्णालय आहार सेवेचे कंत्राट घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था नाशिक या संस्थेला जिल्हा रुग्णालय नंदुरबार व सर्व ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्याच्या सोबतच्या एका नातेवाईकास आहार सेवा मोफत देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्रातातील अटी शर्तीनुसार रुग्णालयात दाखल रुग्णासोबत त्याच्या एकाच नातेवाईकाला मोफत आहार सेवा पुरविण्याचे स्पष्ट आदेश असतांना जास्तीच्या नातेवाईकांना आहार दिल्याचे खोटे भासवून जास्तीची बिले काढण्यात येवून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अर्जात म्हटले आहे कि, सदर संस्थेने अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासन नियमांचे उल्लंघन करीत जास्तीची बिले काढून शासनाची फसवणूक केली आहे. तरी या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमल्यास मोठे घबाड बाहेर येईल, याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जास्तीची काढलेली बिलांची वसुली करण्यात यावी व दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या संस्थेला नंदुरबार, धुळे, जळगावसह दहा ते अकरा जिल्ह्यांचे शासकीय रुग्णालयात आहार सेवा पुरविण्याचे काम मिळाल्याचे समजते. यापुढे या ठिकाणची देखील माहिती मिळवून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भरत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत. सांगितले.