नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विरोधातील लढ्यात अधिकारी-कर्मचारी चांगली कामगिरी करीत असून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी येत्या काळात कोरोना योद्ध्यांनी असाच उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा असताना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमीका महत्वाची आहे. सर्वांनी चांगले योगदान दिल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मर्यादीत ठेवणे शक्य झाले आहे आणि कोरोना योद्ध्यांमुळे जिल्हा सुरक्षित आहे, अशा शब्दात त्यांनी कोरोना योद्ध्यांचा उत्साह वाढविला.
आरोग्य कर्मचारी रुग्णसेवा करताना सात दिवस विलगीकरणात आपल्या कुटुंबापासून, मुलांपासून दूर राहून आपली जबाबदारी पार पाडतात. त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले सेवाकार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येकाने मनात ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचारी गंभीर रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करतात या विषयी आणि त्यांच्या समस्यांयाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
रुग्ण बरे होऊनच घरी जावेत यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आणि रुग्णसंख्या वाढल्याने धावपळ वाढली असल्याचे परिचारिकांनी सांगितले. प्रशासनाने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आरोग्य सुविधांची निर्मिती वेगाने केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही समस्या असल्यास त्वरीत आपल्याशी संपर्क साधावा असे सांगून काही कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना संसर्ग होऊनही न डगमगता त्यांनी बरे झाल्यावर सेवाकार्य सुरू ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नंदुरबार आणि शहादा तहसीलदार आणि नंदुरबार तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोनावर मात करून तातडीने आपले कामकाज सुरू केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कोरोना संकटाच्या परिस्थितीत महिला कर्मचाऱ्यांनी देखील दिवसरात्र परिश्रम घेतल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. कोविड केअर सेंटरमधील वास्तव्याचा अनुभव शहादा कोविड केअर सेंटर उभारताना उपयोगास आल्याचे मिलींद कुलकर्णी यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात चांगली सेवा मिळाल्याचे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी उत्साह कायम ठेवण्यासाठी सहकार्य केल्याचे सांगितले.
डॉ.भारुड यांनी गंभीर रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. प्रशासनातर्फे उत्तम सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न येत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येणार असून तालुका स्तरावर कोविड हॉस्पिटल तयार करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
कोविड केअर सेंटरमधील बाधितांशी संवाद साधून तेथील सुविधांची देखील त्यांनी माहिती घेतली. प्रशासनाने चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रीया एका बाधिताने दिली. बाधित व्यक्तिंनी बरे झाल्यानंतर इतरांपर्यंत उपचार केल्यानंतर हा आजार बरा होतो हा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनावर मात करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असल्याचे डॉ.भारुड म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी, ग्रामसेवक, पोलीस, महसूल कर्मचारी आदींशी संवाद साधला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी आस्थेने चौकशी केली. कठीण परिस्थितीत होणाऱ्या उत्तम कामाचे उदाहरण नंदुरबारची टीम आहे, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. येत्या काळात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्वांनी आवश्यक नियोजन करावे व धैय आणि उत्साह कायम ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नगरपालिका अभियंता चंद्रकांत खर्चे, डॉ.राजेश वसावे, ग्रामसेवक विनोद दोधरे, परिचारिका एस्तर होळकर, गायत्री जोशी, सुरेख धनगर, आरोग्य सेवक हितेश सुगंधी आदींनी संवादात सहभाग घेतला.