नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार मार्फत 16 व 17 सप्टेंबर 2020 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे घेण्यात येणार आहे.
स्थानिक उद्योजकांना रिक्तपदे भरावयाची असल्यास त्यांनी योग्य, गरजू उमेदवार उपलब्ध होण्यासाठी या ऑनलाईन मेळाव्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर पोर्टलवर आपला नोंदणी क्रमांक वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी पोर्टलवर ‘जॉबसिकर रजिस्टर’ या पर्यायाचा उपयोग करून शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी झाल्यावर भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग नोंदवावा.
भरती इच्छूक नियोक्त्यांनी अधिकाधिक रिक्त पदे संकेतस्थळावर अधिसूचित करावी. याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाच्या 02564-210026 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. ऑनलाईन मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी आणि उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ.ला.तडवी यांनी केले आहे.