नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :कोरोनाची संपर्क साखळी कमी कालावधीत खंडीत करण्यासाठी दररोज किमान 300 स्वॅब घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
कोरोनाबाबत आयोजित ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, नंदुरबार तालुक्यातून 125, शहादा येथून 100 आणि तळोदा व नवापूर येथून 70 स्वॅब घेण्यात यावेत. ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीच्या व्यक्तिंमध्ये साधारण लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब घेवून उपचार सुरू करण्यात यावेत. त्यासाठी मोबाईल टीमचा उपयोग करण्यात यावा. शहरी भागासोबत ग्रामीण भागातूनही स्वॅब नमुने घेण्यासाठी नियोजन करावे.
नवापूर येथे स्वॅब नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी जनतेच्या सोईची जागा निश्चित करण्यात यावी. तसेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्राथमिक तयारी करण्यात यावी. अक्कलकुवा येथे देखील असे केंद्र सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. आवश्यकता भासल्यास दोन दिवसात केंद्र सुरू करण्याची तयारी असावी.
महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. रुग्णालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तात्काळ करण्यात यावी. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. महिला रुग्णालयात कोविड बाधितांचे स्थलांतर झाल्यानंतर रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
प्रतिबंधीत क्षेत्रात जनतेला माहिती देण्यासाठी फिरत्या वाहनाची व्यवस्था करावी. बांधितांची ओळख, विलगीकरण आणि उपचार या त्रिसूत्रीवर विशेष भर द्यावा. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित व्यक्तिंची माहिती संपर्क साखळी शोधण्यासाठी संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांना देण्यात यावी.
नवापूर, चिंचपाडा आणि नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. भविष्यात बाधितांची संख्या वाढल्यास प्रत्येकावर योग्य उपचार होतील यादृष्टीने तयारी करावी. खाजगी रुग्णालयात शासनाने निश्चित केल्यानुसार दर आकारले जातील याची दक्षता घ्यावी.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नंदुरबार व शहादा येथील कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्याची गरज असून त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती श्री.गौडा यांनी दिली. स्वॅब तपासणी वाढल्यास मृत्यू दर कमी करता येईल, असेही ते म्हणाले.
संपर्क साखळी शोधण्यावर बारकाईने लक्ष द्यावे. विशेषत: दाटीवाटीच्या वस्तीत आणि सार्वजनिक सुविधांचा वापर असलेल्या भागात संपर्क शोधताना विशेष काळजी घ्यावी, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
आरटीपीसीआर लॅबसाठी आवश्यक मंजूरीची प्रक्रीया पूर्ण झाली आहे. किरकोळ तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर स्वॅबची तपासणी करता येईल. तसेच जिल्ह्यासाठी 2 हजार अँन्टीजन किट्सही प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.