नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)–तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी 7 वाजेपासून नदीत पूरस्थिती निर्माण होणार असून पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकाशा बॅरेजच्या अधोबाजूने गोमाई नदीत सुमारे दीड मीटर उंचीने पाणी वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले असून 31364 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले असून 37 हजार क्युसेक्स विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीला पूर आल्याने या नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 6 द्वारे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 35165 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 5 द्वारे 3 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 45498 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.