नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आठ दिवसाच्या कडक संचारबंदी काळात दूध विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी जिल्ह्यातील दूध व्यावसायिक वाहनधारकांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनातर्फे दिनांक 22 ते 30 जुलै पर्यंत नंदुरबार सह शहादा तळोदा आणि नवापूर या शहरांमध्ये कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे . यात वृत्तपत्रे आणि दूध विक्रेत्यांना सूट देण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे दूध व्यवसायिकांनी आभार मानले आहे. परंतु जारी केलेल्या आदेशात संचार बंदी काळात केवळ कोरोना विषयी कामकाज करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनाच पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचे आदेशात नमूद केले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून दूध विक्रेते वाहनधारकांना इंधनाची गरज असते. याबाबत संबंधित पेट्रोल पंप चालकांना दूध व्यवसायिक वाहनधारकांना पेट्रोल भरून देण्याबाबतच्या सूचना करण्यात याव्यात. जिल्ह्य़ातील सर्व दुध विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक वाहनधारकांतरफे विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.