नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यासाठी 11 महिनाच्या कालावधीकरीता ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ सुरु करण्यात येत असून युवकाना 27 जुलै 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’ अंतर्गत आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमासाठी नीती आयोगद्वारे निर्धारीत करण्यात आलेले उद्दिष्ट आणि संकेतांक प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासाठी या युवाशक्तीचा उपयोग करुन घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या फेलोशिपचे नियोजन व संचालन करण्यासाठी पिरामल फाऊंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून प्रतिभावंत युवकांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे.
फेलोशिपचा अर्ज करण्यासाठी युवक भारतीय नागरीक असावा. महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार 21 ते 30 वयोगटातील अविवाहीत पदवीधर असावा. त्याचे मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व असावे.
फेलोशिपद्वारे युवकांना शिक्षण, आरोग्य व पोषण, आर्थिक प्रवृत्ती, शेती,पाणी व पायाभूत सुविधा आणि जिल्हा प्रशासनाद्वारे कार्यान्वित इतर क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. त्यांना विविध सेवा आणि योजनांच्या सुधारणेशी संबंधित कार्य करावे लागेल. पंचायत, तालुका व जिल्हा पातळीवरील विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील.
फेलोशिपचा कालाधीत 11 महिन्यांचा असून फेलोला दरमहा 23 हजार इतके मानधन दिले जाईल. फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.