नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा,  दिशा समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना जिल्हा कौशल्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत विविध व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील बँकानी मुद्रा बँक योजनेअंतर्गत त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना खासदार डॉ. गावीत यांनी  दिल्या. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील धडगाव, मोलगी येथील दुर्गम भागात बँकाची संख्या पुरेशी नसल्यामुळे नागरिकांना जन धन योजना,उज्जवला योजना अशा अनेक केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ  घेता येत नाही. या भागात जास्तीत जास्त शाखा सुरु करण्यास पाठपुरावा करण्यात येईल. बँकेत गर्दी टाळण्यासाठी बँकांनी टोकन पध्दतीचा वापर करावा. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनाचे पैसे खात्यावर जमा झाल्यावर बँकेने या रक्कमेतून कोणत्याही प्रकारची वळती करू नये. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनधन खाते उघडण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

दुर्गम भागात  प्राथमिक आरोग्य सेवा नियमित राहील याची काळजी घ्यावी. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावे, अशा सूचनाही त्यानी दिल्या.

बैठकीत पुरवठा विभाग, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,प्रधानमंत्री फसल बिमा योजना, एकात्मिक बालविकास योजना, कृ‍षि विभाग, आदिवासी विकास विभाग, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, विद्युत विभाग,महिला बाल विकास विभाग, अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.