नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हरित सातपुडा अभियान’ राबविण्यात येणार असून त्यासाठी वन विभागाने जिल्ह्यात अधिकाधीक रोपवाटिकेची कामे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील,सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात रोपाची आवश्यकता असल्याने अभियानांतर्गत पुढील वर्षांपासून जिल्ह्यात ‘गाव तेथे रोपवाटिका’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वन विभागाने रोजगार हमी योजनेतंर्गत रोपवाटीकेची जास्तीत जास्त कामे घ्यावीत. याद्वारे वृक्ष संवर्धनाबरोबरच स्थांनिक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल.
शेतकऱ्यांना दिर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या आंबा, पेरु, सिताफळ, बाबु, आवळा या वृक्षाची रोपवाटिकेत आर्वजुन लागवड करावी. रोपवाटीकेबाबत आदिवासी ग्रामीण भागात स्थानिक भाषेत ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. त्यांना वृक्ष संवर्धनातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देण्यात यावी व अभियानाचे महत्वदेखील सांगण्यात यावे.
‘गाव तेथे रोपवाटीका’ उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस प्राप्त होणाऱ्या ‘पेसा’ किंवा 14 व्या वित्त आयोगाचा निधी उपयोगात आणता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कमीत कमी 5 रोपवाटीकांची कामे घ्यावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी रोजगार हमी योजनेतंर्गत झालेल्या कामाचा आढावा घेऊन प्रलंबित असलेली कामे त्वरीत करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. याबैठकीस वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कृषी विभागाची आढावा बैठक संपन्न
महात्म गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी विभागाची आढावा बैठक डॉ.भारुड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटी, कम्पार्टमेंट बंडींग, फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध अशा विविध कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे वरिष्ठाशी सन्मवय साधून त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात अनाधीकृत खते व बि-बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री होत असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करावी, त्यासाठी धडक मोहिम आयोजित करावी. दुकानदारांना दुकानाच्या दर्शनी भागावर दरसूची लावण्याचे निर्देश देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
‘निसर्ग ’ चक्रीवादळाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पुर्ण करण्यात यावेत. शासनाच्या बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याच्या योजनेअंतर्गत शेतकरी गटामार्फत जास्तीत शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असेही डॉ.भारूड म्हणाले.
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.पी.भागेश्वर, कृषी उपसंचालक आर.एच.महाले यांच्यासह तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.