शहादा (प्रतिनिधी ) – अखिल भारतीय गुर्जर महासभा जनरल कार्यकारिणीची बैठक शनिवार दि.३०मे रोजी राजस्थानातील पुष्करच्या गुर्जर भवन इमारतीत आयोजित करण्यात आली होती.यावेळी सातपुडा साखर कारखाना शहादाचे चेअरमन बापूसाहेब दीपकभाई पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी स्व. रामसरण भाटी (माजी अध्यक्ष) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यासोबतच समाजातील कोरोना योद्धा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी आ. गोपीचंद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकारणी सदस्य व कोरोना साथीच्या आजारामुळे उपस्थित नसलेले सदस्यांची मते दूरध्वनीने जाणून घेतले.त्यानंतर माजी राष्ट्रीय अध्यक्ष सहकार महर्षि पी.के.अण्णा पाटील यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले.श्री.पाटील यांना पुढील पाच वर्षे राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन व विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आली.यावेळी एकमताने सुरेंद्रकुमार नागर, (खासदार, राज्यसभा) यांना गुर्जर महासभेचे संरक्षक बनवले गेले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पाटील यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची घोषणा केली.
यांत मुख्यत: राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी गोपीचंद गुर्जर (माजी आमदार), नेपालसिंग कसाना, (प्रसिद्ध समाज सेवी), राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मुकेश गुर्जर, अहमदाबाद गुजरात, बच्चूसिंह गुर्जर जयपुर राजस्थान यांचेसह काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशोर दोगणे यांना मध्य प्रदेशच्या अध्यक्षांची जबाबदारी कायम करण्यात आली. यावेळी राजस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष रामप्रसाद धाबाई यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. यावेळी अँड.रमेश धाबाई प्रदेशाध्यक्ष कायदा प्रकोष्ठ, अजमेर जिल्हा अध्यक्ष नथुलाल बजाड, हरचंद पटेल अध्यक्ष अखिल भारतीय वीर गुर्जर सुधार समिती समिती पुष्कर ,रामअवतार गुर्जर नसीराबाद, शिवप्रकाश खटाणा, भागचंद चोपडा, गोपालकृष्ण डोई ,गोपाल गुर्जर खतोलीपुर सरपंच, जगदीप गुर्जर माजी अध्यक्ष किशनगड नगर परिषद, किशन पंचोली, गोपाल कटारिया, नौरतम गुर्जर माजी नगरसेवक अजमेर नगर परिषद, गिरधारी कालस, मकडवली, ओमप्रकाश गुर्जर, दीपक रावत बनसूर अलवर, महावीर गुर्जर सरचिटणीस राजस्थान, नारायण खोडवा, महावीर फौजी ,भगवान सिंह खटाणा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दीपकभाई पाटील यांनी अ.भा.गुर्जर महासभेचे वरिष्ठ कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असून लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी ,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ,श्री पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन शहादा याचे अध्यक्ष आहेत .त्यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शहादा पंचायत समितीचे सभापती पदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे .कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पक्ष -संघटनांवर पदाधिकारी म्हणून आपल्या कार्याची छाप पाडली आहे . त्यांनी वस्त्रोद्योग महामंडळ, साखर महासंघ , राज्य दूध उत्पादक संघ महानंदा आदींवर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संचालक म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.त्यांच्या निवडीचे परिसरातील सर्व स्तरावरुन स्वागत करण्यात आले आहे.