नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्ह्यासाठी आजचा दिवस आणखीन दिलासादायक ठरला असून आज ६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज या सर्वांचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयातुन डिस्जार्च मिळाला. यामुळे आता नंदुरबारच्या कोरोना उपचार केंद्रात ४ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. हि संख्या शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंत जिल्हातील २१ जणांचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. यातील दोघांचा मृत्यु झाला असून या आधी ०९ जन कोरोना मुक्त झाले होते. आज आणखीन ०६ जन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उर्वरित ०४ जणांवरच उपचार सुरु आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शहाद्यातील ५ तर अक्कलकुवा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या ९ जणांवर रुग्णालयातुन बाहेर जांतांना फुलांची उधळण करण्यात आली. आज कोरोनामुक्त होवुन परतलेल्या रुग्णांमध्ये एका अॅम्ब्युलंन्स चालकांचा देखील समावेश होता. माजी सैनिक असलेल्या रुग्णवाहीका चालकाचा निरोपाच्या वेळेचा उत्साह पाहण्याजोगा होता. आज माजी सैनिक असल्यासारखे भासत असल्याचे सांगत सर्व कोरोना बाधीतांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वोत्तम उपचार होत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा देखील या चालकाच्या स्वागतासाठी आवर्जुन उपस्थित होते.