नंदुरबार – कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत संसर्ग पसरू नये यासाठी वापरण्यात येणारे मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेऊन रोजगार निर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. याशिवाय घरपोच किराणा माल पोहोचविणे आणि भाजीपाला विक्रीतूनही समूहांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून ‘उमेद’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी प्रभाविपणे करण्यात येत आहे. एप्रिल 2020 अखेर एकूण 14 हजार 966 महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून 1 लाख 47 हजार 961 कुटूंबाचा समावेश या अभियानात करण्यात आलेला आहे. समूहांना गावस्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून स्थानिक गावातील 1000 महिला कार्यरत आहेत.
कोविड संकटाचा सामना विविध स्तरावर करावा लागत असताना त्याचे संधीत रुपांतर करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून समूहातील महिलांनी केला. त्यातून मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. आतापर्यंत 13 हजार मास्क तयार करून त्यातील आरोग्य विभागाला 10 हजार व इतर विभागांना 3 हजार देण्यात आले आहे. मास्क तयार करताना आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालनदेखील करण्यात येत आहे.
16 समूहांच्या 13 महिलांनी हे काम सुरू केले. काही महिला घरातच वैयक्तिक स्वरुपात व काही सामुहिक स्वरुपात कोरोनापासून सुती कापडाचे मास्क तयार करीत आहे. मास्कची किंमत 10 ते 30 रुपये एवढी आहे. उत्पन्नासोबत कोविडशी लढण्यासाठी आवश्यक वस्तूची निर्मिती करण्याचे समाधानही मिळत असल्याची महिलांची भावना आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत, व नंदुरबार ,नवापुर व शहादा तालुक्यातील विविध शासकीय विभागाकडूनही त्यांच्याकडे मास्कची मागणी होत आहे.
अभियानाच्या माध्यमातून 10 समूहाचे एक ग्रामसंघ असे 780 ग्रामसंघ तयार करण्यात आले आहे. त्यापैकी 60 ग्रामसंघांना जोखीम प्रवणता निधी देण्यात आला. यातील 30 ग्रामसंघांनी गावातील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. एकूण 289 कुटुंबांना 9 लाख 10 हजार रुपयांच्या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. मागणी प्रमाणे एकत्रित वस्तू खरेदी करून पुरवठा होत असल्याने समूहांना आर्थिक लाभ होत आहे आणि नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.
समूहातील महिलांनी अनेक ठिकाणी परसबागेत भाजीपाला लागवड केली आहे. हा भाजीपाला देखील माफक दरात नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे गावात तयार होणारा भाजीपाला शेतकरी शहरात विकू शकत नाही. हा भाजीपाला खरेदी करून गावातच घरोघरी विक्री करण्याचा उपक्रमही काही समूहांनी राबविला. या सर्व उपक्रमांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
व्यवसायाशिवाय कोविड आजाराबाबत इतर महिलांना माहिती देण्याचे आणि स्वच्छतेचे महत्व गावात पोहोचविण्याचे कामही या समूहांमार्फत होत आहे. गावात अंगणवाडी क्षेत्रात गरोदर व स्तनदा मातांसाठीचा पोषण आहार त्यांना घरपोच करणे, आशा कार्यकर्ती सोबत आरोग्य सर्वेक्षण करणे, सॅनीटायझर वाटप अशा कामांमध्येदेखील या महिलांचा पुढाकार आहे.
अभियानात सहभागी समूहांच्या माध्यमातून गावातील आर्थिक उन्नतीला हातभार लावण्यासोबतच संकटकाळात प्रशासनासोबत काम करणारी भक्कम फळी उभी राहीली आहे. ग्रामीण भागासाठी ही नवी ‘उमेद’ आहे. या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापकाशी संपर्क साधून मास्क अथवा इतर आवश्यक वस्तूंची मागणी नोंदवावी, असे आवाहन श्री. गौडा यांनी केले आहे.