नंदुरबार(प्रतिनिधी):- वृद्धापकाळाने कैलासवासी झालेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी कोरोना संकटाच्या काळातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दशक्रिया विधी वैगरे सोपस्कार न करता, त्यासाठी अपेक्षित खर्चाची रक्कम थेट कोरोना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा आदर्श निर्णय शनिमांडळ येथील रहिवासी व मुंबई येथे शासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत पाटील बंधुद्वयांनी घेतला.
जिल्ह्यातील शनिमांडळ येथील रहिवासी व सध्या दहिसर ( मुंबई ) येथे वास्तव्यास असलेल्या कै. सिंधुताई गिरीधर पाटील ( वय 81 ) यांचे, दहिसर येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीवर होणाऱ्या संभाव्य खर्चाची रक्कम कोरोना (कोव्हीड – 19) च्या लढ्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगी म्हणून जिल्हाधिकारी , नंदुरबार यांना धनादेशाद्वारे सुपुर्द करण्यात आली.
कै. सिंधूताईंचे पती श्री . गिरीधर लक्ष्मण पाटील, सुपुत्र श्री. संजय गिरीधर पाटील ( उपसचिव , सामाजिक न्याय विभाग , मंत्रालय , मुंबई ) आणि श्री . विजय गिरीधर पाटील, भा. पो. से. (पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक) यांनी हा निर्णय घेतला.
पाटील कुटुंबियांनी दशक्रिया विधीसाठी लागणारा खर्च न करता, ती रक्कम रु . 51000 / ( रुपये एक्कावन्न हजार मात्र ) कोरोना (कोव्हीड – 19) च्या लढ्यात योगदान म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रदान केली. या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. पाटील कुटुंबियांच्यावतीने त्यांचे आप्तेष्ट श्री. देवराम चिंधा पाटील रा. शनिमांडळ तसेच नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, श्री. सुनिल नंदवाळकर यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केला. याद्वारे सामाजिक रुढी – परंपराबाबत समाजात एक चांगला संदेश जावून निश्चितच अनेकांना याद्वारे प्रेरणा मिळणार आहे.