नंदुरबार : अक्कलकुवा येथील आणखी एक व्यक्तीचा स्वॅब अहवाल कोवडि-19 पॉझिटीव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. डॉ.भारुड यांनी अंबाबारी चेकनाक्यालाही भेट दिली आणि अक्कलकुवा येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी नवोदय विद्यालय येथे क्वॉरंटाईन केंद्राचीदेखील पाहणी केली. त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपविभागीय अधिकारी अविश्यांत पंडा, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर आणि तहसीलदार विजय कच्छवे होते.
डॉ.भारुड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेबाहेरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारे प्रवेश देऊ नये. वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात यावे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा घरपोच मिळतील याचे निट नियोजन करावे.
प्रतिबंधीत क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही व बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कोविड-19 बाधीत व्यक्तीची संपर्क साखळी त्वरीत शोधून त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना त्वरीत क्वॉरंटाईन करण्यात यावे व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्वॉरंटाईन केंद्रात आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक दक्षता घेण्यात याव्यात. नागरिकांना जीवनावश्यक धान्य व जीवनावश्यक व्सतू मिळण्यात कोणताही त्रास होणार नाही आणि वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.