नंदुरबार दि.21-‍  जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत असून या संदर्भात प्रभावी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर मॉडेल’वर पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली.
या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी, नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एन.बोडके तसेच जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.राऊत यांनी इस्लामपूरने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या केंटेनमेंट आरखड्यानुसार प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करण्यात आली. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची छाननी, त्यांचे मोबाईल ट्रॅकींग, अतिजोखमीच्या व्यक्तींना क्वॉरंटाईन करणे, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविणे, पॉझिटीव्ह व्यक्तींना आयसोलेशन कक्षात ठेवणे, कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींची 14 दिवस तपासणी, परिसराचे निर्जंतुकीकरण, जीवनावश्यक वस्तू घरपोच देणे,बफर झोनमधील सर्वेक्षण आदी उपाययोजना केल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी
सांगितले.
इस्लामपूरचा अनुभव नंदुरबार जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री पाडवी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी सांगलीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कार्ययोजनच्या विविध पैलूंची माहिती दिली. चर्चेतील मुद्यांचा अभ्यास करून नंदुरबार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात यानुसार कार्यवाही करण्यात यावी. परिसरातील नागरिकांना प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी व नियमित वैद्यकीय तपासणी करावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
इस्लामपूर मॉडेलनुसार शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून परिसरात वैद्यकीय सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना बाहेर पडू न देता त्यांना विविध सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. चर्चेतील माहितीनुसार कारोना प्रतिबंधाच्या उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविण्यात येतील, असेही ते म्हणाले.