नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना सुविधा म्हणून घरपोच स्वस्त दरातील धान्य योजनेंतर्गत साहित्य वाटप केले जात असून, तालुक्यातील कोठली खुर्द येथे या योजनेंतर्गत साहित्य वाटपाला सुरुवात करण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा व प्रांताधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने शहरी भागासह ग्रामीण भागाच्या जनतेला घरपोच धान्य वितरण योजनेंतर्गत गहू, साखर, डाळ-तांदूळ या जिवनावश्यक साहित्यासह भाजीपाल्याचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने व लोकसहभागातून नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द गावात अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत गावातील सुमारे अकराशे लाभार्थ्यांना 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू व 20 रुपये किलो साखर या दराने एका व्यक्तीस 15 किलो तांदूळ, 10 किलो गहू व 1 किलो साखर सोबतच गावातील समाजसेवी व्यक्तींकडून प्राप्त भाजीपाला टमाटे, कारले, मका अशा साहित्याचे 1100 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा, प्रांताधिकारी श्रीमती वसुमना पंत, तसेच सर्वश्री तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तालुका आरोग्य अधिकारी जे. आर. तडवी, पंचायत समिती सदस्य दिनेश वळवी, ग्रामपंचायत सदस्य विलास शेगजी वळवी, बालाजी संजय वळवी, ग्रामसेवक आर. डी. पवार, पोलीस पाटील प्रल्हाद जगन्नाथ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या शाळांमध्ये शिल्लक असलेला दाळ, तांदूळ हा साठा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सम प्रमाणात वाटप केला जाणार असून, सोबतच अंगणवाडी अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेअंतर्गत घरपोच पोषण आहार दिला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा लढा देत आहे त्या सुरक्षा, आरोग्य, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा सर्व प्रकारच्या यंत्रणांना शासनाकडून 50 लाखाचे
विशेष विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.