नंदुरबार येथील सर्व्हे नं.451 वरील अनधिकृत इमारत तोडण्याच्या पालिकेच्या आदेशाला तिलांजली
नंदुरबार- (जगदिश ठाकूर)
शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात असलेल्या सर्व्हे नं.451 याठिकाणी व्यापारी गाळ्यासह इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकार्यांनी सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. परंतू, असे असतांनाही पालिका मुख्याधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संबंधित मालकांनी व्यापारी गाळ्यांसह इमारतीचे बांधकाम सुरुच ठेवले असल्याचे दिसून येते. विद्यमान मुख्याधिकार्यांनी संबंधित मालकांना पालिकेत बोलवून इमारतीचे अनधिकृत सुरु असलेले बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या असल्यास तरी, नियमबाह्य असलेली अनधिकृत इमारत बांधकाम करणार्या मालकावर काय कार्यवाही होईल? याकडे लक्ष लागून आहे.
नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय इमारत म्हणजे सध्याची नगरपालिका इमारतीच्या पाठीमागील भागात परदेशीपूरालगत सर्व्हे नं.451 या जागेवर इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी नंदुरबार नगरपालिकेने निवास म्हणजे रेसीडेन्सीसाठी परवानगी दिली होती. परंतू, संबंधितांनी त्या परवानगीला तिलांजली देत त्या जागेवर व्यावसायिक म्हणजे कमर्शियल दृष्टीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे निवासाच्या नियमानुसार बांधकाम न करतांना व्यापारी गाळे काढून बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात पालिकेकडे सदर बांधकाम अनधिकृतपणे सुरु असल्याची यापूर्वीच तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मध्यंतरी हे बांधकाम थांबविण्यात आले होते. प्राप्त तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकारी सर्व्हे नं.451 याठिकाणी निवासाऐवजी व्यवसायिकदृष्टीने बांधकाम होणारी इमारत तोडण्याचे आदेश जारी केले होते. परंतू, या आदेशाला काही कालावधी लोटताच पुन्हा सदर मालकांनी इमारतीचे बांधकाम व्यवसायिक दृष्टीने सुरु केले आहे. टोलेजंग उभारण्यात आलेली ही इमारत पालिकेने दिलेल्या परवानगी ऐवजी नियमबाह्य बांधण्यात येत आहे. निवास ऐवजी कर्मर्शियल बांधकाम होत असल्याने इमारतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या इमारतीला प्लास्टर करण्याचे काम सुरु असून संबंधितांनी पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांनी बजावलेल्या आदेशाला तिलांजली दिल्याची चर्चा सुरु आहे. तर विद्यमान मुख्याधिकार्यांनी काल संबंधित इमारतीचे बांधकाम करणार्या मालकांना बोलवून इमारतीचे बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून देखील इमारतीचे बांधकाम सुरूच आहे. सदर बांधकामाच्या ठिकाणी विद्यमान मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाऊन बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे तूर्तास इमारतीचे बांधकाम थांबविण्यात आले असले तरी, पालिकेने दिलेल्या परवानगी ऐवजी अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतीवर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी इमारत तोडण्याची बजावलेल्या आदेशाची कार्यवाही कायम होईल की? सदर इमारत जैसे थै राहील, याची चर्चा सुरु आहे.