नंदुरबार (जिमाका वृत्त) – शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना नवीन प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतीभवन खेळाडूची निवड करून त्यानां संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविणे व सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत असून या प्रबोधनींमध्ये प्रवेशासाठी 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे.
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणच्या क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड प्रक्रीया होणार असून ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टींग अशा एकूण 17 क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबत समिती समक्ष चाचणी देऊन प्रवेश देण्यात येईल, क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. या चाचणीमधून निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल.
जिल्हास्तरावर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 5 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, साक्री नाका नंदुरबार येथे संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.