नंदुरबार (जिमाका वृत्त) जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2024 साठी 10 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय श्रावणीचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेतील इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेला (2023-24) असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा. विद्यार्थी हा 2021-22 ते 2023-24 मध्ये इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत, तसेच तृतीयपंथीय उमेदवारही निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतील. निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली असून परिक्षेसाठी डेक्सटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅब याद्वारे नवोदय विद्यालय समितीच्या https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 किंवा https://cbseitms.nic.in/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जासाठी आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र, रहिवासी दाखला, फोटो, स्वाक्षरी आवश्यक आहे.
प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2023 आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी, एस.एन. जाधव मोबाईल क्र. 9404814281 विनोद पाटील मोबाईल क्र. 8830745576 यांच्याशी संपर्क साधावा असेही मुख्याध्यापक श्री. कोसे यांनी कळविले आहे.