नंदुरबार (जिमाका वृत्त): आगामी दिवसामध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देवून आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहेत.
नंदुरबार जिल्हा हा उष्मालाट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे मागील दोन दिवसांपासुन वातावरणातील बदलामुळे मोठया प्रमाणात तापमानात वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून जिल्ह्यात विशेषतः मे महीन्याच्या दुसन्या पंधरवड्या पासून मोठ्या प्रमाणात तापमाणात वाढ होताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात ही वाढ मे २०२३ चे अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांनी आरोग्याची विषेश काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्मालाटेमुळे उष्माघातामुळे मानव, पशु- पक्षी व शेती पिकांवर विविध दुष्परिणाम उद्भवतात. म्हणुन नागरीकांनी आरोग्याची/ उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्यात यावी.
उष्माघाताची लक्षणे
शरीरास घाम सुटणे, वारंवार तहान लागणे, शरीर शुष्क होणे व थकवा येणे, ताप येणे १०२ पेक्षा अधिक जास्त ताप वाढणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेन अवस्था होणे कधी कधी बेशुद्ध अवस्था किंवा उलटी होणे, शरीराचे तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मानवी शरीराच्या अंतर्गत विविध बदल होऊन शरीराचे नियंत्रण कमी होते वेळ प्रसंगी मनुष्याचा मृत्युही होतो.
उष्माघात टाळण्यासाठी काय करु नये
दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे / परिधान करणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे.
उष्माघात बचावासाठी हे करावे
तहान लागली नसली तरी भरपुर पाणी प्यावे, हलकी पातळ सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा. प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असताना टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ. आर. एस. घ्यावे, लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी नियमित सेवन करावे, गुरांना व पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर वसनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गरोदर महीला, लहान मुले, वृध्द, आजारी व्यक्ती अधिक काळजी घेण्यात यावी, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, कॉक्रीट घराचे छतावर पांढरा रंग द्यावा, टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडवा यांचे आच्छादन करावे, मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
उष्माघात झालेल्या व्यक्तीस किंवा उष्माघाताची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीस तात्काळ मदत करावी त्याचे शरीर ओल्या कपडयाने पुसून शरीराचे तापमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. मदतीसाठी अॅम्ब्युलन्ससाठी हेल्पलाईन क्र. १०८, ११२. १०२, १०७७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार उष्मालाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.खांदे यांनी केले आहेत.