नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ज्याप्रमाणें आज आपण राज्याचा 63 वा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहोत, त्याचप्रमाणे चालू वर्ष हे नंदुरबार जिल्ह्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात जिल्हा निर्मितीसह येथील सर्वच क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल थक्क करणारी अशीच आहे. तसेच वाढत्या दळण-वळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे, असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काढले आहेत.
ते आज महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जि.प उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, जात पडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मुख्याधिकारी पुलकीत सिंह, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्याचे प्रशासकीय संकुल, जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेची इमारत, जिल्हा न्यायालयाची इमारत, जिल्हा ग्राहक मंच, शासकीय ग्रंथालय, तहसील व उपविभागीय कार्यालयांच्या इमारती, शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसह सार्वजनिक बांधकाम भवन यासह सर्वच विभागांची स्वतंत्र कार्यालये, स्वतंत्र इमारती जिल्ह्यात सुरु झाली आहेत. वाढत्या दळण-वळण आणि सिंचनाच्या नव्या संधींमुळे राज्यातील नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात व राज्यात झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. राज्यातील सर्वाधिक आदिवासी बहुल जिल्ह्यांपैकी म्हणून एक हा जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यासह, राज्यातील आदिवासी बांधवांचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिकदृष्ट्या वेगळे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्याचा सामाजिक, व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक उपाययोजना जिल्हाधिकारी, जिल्हा पोसीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध यंत्रणांच्या मध्यमातून हाती घेतल्या आहेत. येथील आदिवासी बांधवांसह सर्व समुदायातील नागरिकांना त्यांच्या पायावर भक्कमपणा उभे करून स्वावलंबी करण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकासाचा 25 वर्षांपूर्वी केलेला संकल्प आज साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे.
ते पुढे म्हणाले, नंदुरबार हा शेतीप्रधान जिल्हा आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखी आणि समाधानी कसा राहिल यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी २ लाख ८८ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट असून त्यासाठी २१ हजार ५७४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ८७ हजार ९९० मॅट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत २४ शेतकऱ्यांच्या वारसांना ४८ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ५ हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १ लाख १२ हजार शेतकऱ्यांना १३ हप्त्यांचे वितरण झाले आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे बाधित नुकसानग्रस्त १०७ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये ४ हजार ७३० हेक्टरसाठी ८ कोटी, १३ लाख,२३ हजारांची मदत सरकारच्या वतीने वितरित केली जाणार आहे.
जिल्ह्यातील एकही माणूस उपाशी राहू नये या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचे मार्च २०२३ अखेरपर्यंत ४ लाख ९९ हजार ७५५ इतके वितरण करण्यात आले आहे. तसेच दिवाळी, गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनमित्त ४ लाख ८३ हजार केसरी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ या अभियानातून १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना विवध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.
यावेळी बोलताना आपल्या भाषणातून पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, या भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. आदिवासी भागातील गाव, वाडे-वस्त्यांवर आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या मुलभूत सविधा पुरविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून कामे जलद गतीने पूर्ण केली जाणार आहेत. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, नवे वाळू वितरण धोरण, मुख्यमंत्री सहाय्यक कक्ष, ग्रामपंचायतींचा विकास, जलजीवन मिशन जलयुक्त शिवार 2.0, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, व जिल्हा नियोजनाच्या तरतूदींचा गोषवारा सांगत, कोरोनाबाबत सतर्क राहण्याचेही आवाहनही त्यांनी यावेळी जिल्हा वासियांना केले.
महाराष्ट्र गीताने दुमदुमला परिसर
आजच्या महाराष्ट्र दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे आशयपूर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपरांची गाथा सांगणारे कवीवर्य श्री. राजा निळकंठ बढे यांची रचना असलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून राष्ट्रगीता सोबत भविष्यात प्रत्येक शासकीय कार्यक्रामत म्हटले जाईल. ते आजच्या माहाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्र गीताने आज हा कार्यक्रम व परिसर दुमदुमून गेला होता.
यांचा झाला सन्मान
राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाननिमित्त व कामगार दिनाननिमित्त विविध विभागामार्फत दिल्या जाणारे पुरस्कार व सन्मान यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले, ते पुढील प्रमाणे आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, पोलीस हवालदार विलास पाटील, लक्ष्मीकांत निकुंभ, रविंद्रसिंग पाडवी, पोलीस नायक पंकज महाले यांना पोलीस महासंचालक सन्माचिन्ह 2022 देण्यात आले. तर महसुल व वन विभागामार्फत तलाठी बळीराम चाटे यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत ‘Gendr Sensitive Role Model Award ’ म्हणून जिल्हास्तरावर 24 पुरुषांना नामांकन मिळाले असून त्यापैकी भीमसिंग पाडवी, मगन गावित, गोपाल पावरा यांना ‘सुधारक’ सन्मान प्रदान करण्यात आला. युवा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून जगदीश वंजारी, रोमाना पिंजारी, ऋषिकेश मंडलिक, पल्लवी प्रकाशकर, मुकेश पाटील, तेजस्विनी चौधरी यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार (युवक व युवती ) पुरस्कार प्रदान करण्यात आला तर नंदुरबार तालुका विधायक समिती, नंदुरबार तसेच युवक मित्र परिवार,कोठली ता.शहादा यांना जिल्हा युवा पुरस्कार (संस्था ) प्रदान करण्यात आला.
नियुक्ती आदेशाचे वाटप
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली त्यात भूमी अभिलेख विभागातील निकिता बच्छाव, मयुर बडमे, ऋषिकेश चौरे, शिमान गावित, शैलजा पाटील यांना भूकरमापक तथा लिपिक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आली. तसेच वस्तु व कर सेवा विभागामार्फत चेतन मराठे, तेजस्वी ठाकरे यांना राज्यकर निरीक्षक पदाची तर जिल्हा शल्य चिकित्स संवर्गात डॉ.संजय गावित यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विपुल जितेंद्र अहिरे, भूमिका आगळे, हर्षल भटकर, हर्षदा महाले या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे शुभेच्छा पत्र देण्यात आले. तर पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात राज्यात उत्कृष्ठ काम करणारे कृषि अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषि अधिकारी किशोर हडपे, निलेश गढरी, जिल्हा संसाधन योगेश कहार यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते नदीच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलांच्या वारस दिलवरसिंग पाडवी, अशोक पाडवी यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आला.
यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, 207 वज्र आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सहभाग घेतला.
यावेळी जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी, उप विभागीय पोलस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, शिक्षणाधिकारी सतीष चौधरी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, यांचेसह विविध कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी अधिकारी-कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.माधव कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुबे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.