नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याकरीता वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लाभार्थींना थेट कर्ज योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
योजनेचे स्वरुप प्रकल्प
या योजनेत मुल्य रूपये एक लाख असून महामंडळाचा सहभाग 85 टक्के तर अर्जदाराचा सहभाग 5 टक्के राहील. यासाठी व्याज दर 4 टक्के असून परतफेडीचा कालावधी 3 वर्ष इतका राहील.
पात्रतेचे निकष
अर्जदार हा मातंग समाज व तत्स्मम 12 पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षपेक्षा जास्त नसावे. अर्जदार या जिल्ह्याचा रहिवासी असावा, त्याचे सबिल क्रेडीट स्कोअर 500 असावे. अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.
अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला 50 टक्के आरक्षण राहील तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगती प्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदारास कर्जमंजुरी व वितरणापूर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र द्यावे लागेल. अर्जदाराकडून कर्जमंजुरी नंतर कर्ज वितरणापूर्वी 2 जामिनदार एक नोकरदार लागेल, त्याच्या कार्यालयाकडील विभाग, कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठी हमीपत्र घेण्यात येईल, तर दुसरा मालमत्ता धारक जामीनदाराच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करुन देणे आवश्यक आहे. अर्जदारास कर्ज मंजुर, वितरणापूर्वी कर्ज वसुली पोटी उत्तर दिनांकीत धनादेश देणे बंधनकारक राहील. अर्जदाराने मंजुर कर्जाचा पहिला हप्ता वितरीत केल्यानंतर व्यावसायाचा विमा महामंडळ व लाभार्थी यांचे संयुक्त नावे करणे बंधनकारक राहील. व दर वर्षी विम्याचे नुतनीकरण करणेसाठी होणारा खर्च लाभार्थीने स्वत: करावा. कर्ज वितरण झाल्यापासून तीन महिन्यानंतर कर्जाची वसुली (मुद्दल व व्याज) याप्रमाणे करावी. महामंडळात कर्ज वसुली दरमाह भरावी.
कर्ज योजनेचे अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 23 फेब्रुवारी,2023 आहे. हे अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सांय. 6.15 पर्यंत स्विकारले जातील. प्राप्त कर्जप्रकरणांची छाननी, तपासणी शासन निर्णयानुसार करण्यात येऊन लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये संबधित अर्ज ठेवण्यात येतील. लाभार्थी समितीमध्ये मंजुर झालेल्या पात्र लाभार्थीचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीस पाठविण्यात येतील. त्याचप्रमाणे जिल्हा कार्यालयास दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा जास्त कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड शासन आदेशानुसार लॉटरी पद्धतीने समितीमार्फत करण्यात येईल.
मांतग समाजातील होतकरु महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थीनीं या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. नंदुरबार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210181 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.