नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कार्यशाळा ( NAS Intervention Workshop) आयोजित करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी टीमने नोव्हेंबर 2024 मध्ये होणा-या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात आपला जिल्हा पुढे राहण्यासाठी इयत्ता व विषयनिहाय कृती कार्यक्रम तयार करून गटनिहाय सादरीकरण करण्यार आले.


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून श्री.सतीश चौधरी शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.नंदुरबार. श्री.मच्छिंद्र कदम शिक्षणाधिकारी ( माध्य.) जि. प.नंदुरबार, श्री.प्रवीण चौहान (वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट) हे उपस्थित होते. तर कार्यशाळा सुलभक म्हणून श्री.रमेश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता, श्री.देवेंद्र बोरसे, विषय सहाय्यक, डायट नंदुरबार यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री.रमेश चौधरी यांनी केले. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 मध्ये नंदुरबार जिल्ह्याची प्रगती राज्याच्या व देशाच्या तुलनेत कशी आहे ? इयत्ता 3, 5, 8 व 10 वीच्या वर्गातील कोणत्या अध्ययन निष्पत्तीवर काम करणं आवश्यक आहे. नियोजित राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण नोव्हेंबर 2024 मध्ये जिल्ह्याचा प्रगती आलेख उंचावण्यासाठी प्रत्येक अध्यायन निष्पत्तीवर वर्गनिहाय व विषयनिहाय कसा कृती कार्यक्रम तयार करता येईल? यावर आधारित सविस्तरपणे विश्लेषण करतांना यामध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2020 पार्श्वभूमी, महत्त्व व सद्यस्थिती यावर दृष्टिक्षेप टाकून कार्यशाळेचा उद्देश त्यांनी सांगितला.


कार्यक्रमाच्या उद्घाटन व शुभेच्छा संदेश प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सतीश चौधरी म्हणाले कि, इयत्ता 3 री, 5 वी, 8 वी, 10 वी संदर्भात 2021 मध्ये झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण च्या निष्कर्षानुसार पुढच्या दृष्टिकोनातून नियोजन करणे गरजेचे आहे. त्यातील आघाडीच्या जिल्ह्याच्या दृष्टीने तेथील पर्यवेक्षकीय यंत्रणा जर चांगलं काम करू शकते तर आपणही निश्चितच करू शकतो. स्कॉलरशिप परीक्षांची तयारी नियोजनबद्ध आपल्या जिल्ह्यासाठी करता येईल व निर्देशांक वाढवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र कदम यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि, प्रशिक्षणाची नेमकेपणाने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मुलांमध्ये जिज्ञासा जागृत करणे, त्यांना प्रश्न विचारायला संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना प्रश्न पडणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला चालना देऊन पुढील मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

डाएटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपली स्वतःची कार्यक्षमता तयार करणे आवश्यक असल्याचे सांगतांनाच गुणवत्तेला पर्याय नाही, त्यामुळे चांगले कामच करणे गरजेचे आहे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे आपण कुठे आहोत, याची गरज, क्षमता, कौशल्य, संधी यानुसार मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पुढे काय? या प्रश्नानुसार संधीची भाषा ही मुलांच्या कलांवर अवलंबून आहे. म्हणून शिकण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गणित असेल तर गणिताचा सराव, भूमिती प्रमेय, सिद्धांत यांच्या संकल्पना स्पष्ट होणे आणि त्याचे दृढीकरण होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री.रमेश चौधरी यांनी कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या दृष्टीने इयत्तानिहाय देश, राज्य, आघाडीचे जिल्हे आणि आपला जिल्हा कोणत्या पातळीवर आहे ? यावर विश्लेषणात्मक सांख्यिकी माहितीवर आधारित उपस्थितांबरोबर चर्चा घडवून आणली.
तर द्वितीय सत्रामध्ये गटकार्याच्या माध्यमातून 2024 मध्ये होणाऱ्या चाचणीसाठी 3 री, 5 वी, 8 वी, 10वी याप्रमाणे अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार करण्यासाठी गटचर्चेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात आला व गट निहाय सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यशाळेची परिणामकारकता जाणून घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 मध्ये जिल्हा कास्टडीअन म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडलेले महावीर इंग्लिश मीडियम स्कूल शहादा चे मुख्याध्यापक श्री. अंबालाल पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.

या कार्यशाळेस डाएटमधील अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार, श्री पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे, श्री. सुभाष वसावे यांच्यासह नंदुरबारचे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील, शहादाचे श्री डी. टी. वळवी, धडगाव चे श्री राजेंद्र बच्छाव, नवापुरचे श्री आर. बी. चौरे, अक्कलकुवा चे श्री मंगेश निकुम व तळोदाचे श्री शेखर धनगर यांच्यासह निवडक शिक्षण विस्तार अधिकारी, निवडक केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळांचे निवडक मुख्याध्यापक, निवडक प्राथमिक शिक्षक, जिल्ह्यातील एनजीओ सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचलन विषय सहायक श्री. देवेंद्र बोरसे यांनी केले.