नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असुन सद्यस्थितीत 26 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील कोठली, पिंपळोद, पथराई, शिंदे यागावासाठी तर नॉन पेसाक्षेत्रातील रनाळे, वैदाणे गावासाठी सहा, नवापूर तालुक्यातील वडकळंबी,भादवड,धनराट गावासाठी तीन , तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, चिनोदा, नळगव्हाण, शिर्वे, तसेच सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयासाठी पाच, अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा, उमरगव्हाण, सिदुरी गावासाठी तीन, अक्राणी तालुक्यातील धनाजेसाठी एक आणि शहादा तालुक्यातील वैजाली, डोंगरगाव, कुढावद, चिखली बु., कवळीथ तर नॉन पेसाक्षेत्रातील कुकडेल, तोरखेडा, फेस या गावासाठी आठ तलाठी असे एकूण 26 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
नंदुरबार तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षक विभाग वगळता कोणत्याही विभागाने पदभरती करु नये असे आदेश शासनाने दिल्यामुळे ही भरती पुर्ण होवूनदेखील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नव्हते. महसूल विभागामार्फत सदर तलाठी भरतीची कार्यवाही विनाविलंब पुर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनास कळविले होते. त्यानुसार पदभरतीसाठी मान्यता देताच उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.