नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता होळी सण साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी अटी-शर्तींच्या अधीन राहून 28 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुभा दिली असून सण साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून होळी सण साधेपणाने साजरा करण्यात यावा. होळी सण साजरा करताना एकूण 5 जणाची उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. होळी व धुलीवंदन उत्सवाच्या ठिकाणी मोठे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. याबाबतीत स्थानिक प्रशासनाने लादलेले निर्बंध लागू राहतील व या आदेशानंतरही कडक निर्बंध लादू शकतील, मात्र प्रस्तूत मार्गदर्शक सुचना यापेक्षा शिथील करता येणार नाही. यापूर्वी सणाबाबत देण्यात आलेला आदेश वरील कालावधी वगळता कायम राहील.
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.