नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी या योध्यांसाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील ५० रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील संमती पत्र प्रशासनाला दिले आहे.
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. भारतातही या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण वाढत आहे. अश्या परिस्तिथीत पोलीस, डॉक्टर, नर्सेससाठी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी स्वतःच्या घराबाहेर राहत आहेत. थोडासा विसावा घ्यायचा तर कुठे घ्यावा ? हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. अश्या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती काही न काही योगदान देतांना दिसत आहेत.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. आता नंदुरबार येथील त्यांच्या मालकीचे हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्याना भोजनाची सेवा करण्याची देखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त करत, कोविड-१९ संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले.