नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘ब्रेक द चेन’ अभियानांअतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या कालवधीत सरकारी कामगार अधिकारी धुळे कार्यालयाच्यावतीने स्थलांतरीत कामगारांची धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध आस्थापना, कारखान्यांमध्ये काम करीत असलेले स्थलांतरीत किंवा परप्रांतीय कामगार निर्बंधामुळे त्यांच्या मूळगांवी (मुळ राज्यात) जात असल्यास या कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव, पत्ता आदी माहिती dhulelabour@gmail.com या ईमेलवर पाठवावी. तसेच परराज्यात काम करीत असलेले धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कामगार जर लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात त्यांचे मूळगावी परत येत असतील किंवा आलेले असतील तर त्यांनीदेखील याच प्रकारची माहिती पाठवावी.
जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, दाळवाले बिल्डींग, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, अग्रवाल भवन समोर, धुळे येथे समुदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. अ.ज. रुईकर सरकारी कामगार अधिकारी हे केंद्राचे प्रमुख आहेत.
स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्यविषयक समस्याकरीता मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा. तसेच स्थलांतरीत कामगारांना अडचणी किंवा प्रश्न असल्यास 02562-283340 या क्रमांकावर किंवा वरील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.ज. रुईकर धुळे यांनी केले आहे.