नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पानातून स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम 2020 मध्ये 20 हजार 990 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून खरीप हंगाम 2021 मध्ये 21 हजार 510 हेक्टरवर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये सोयाबीन बियाणाच्या विक्री केंद्रावर तुटवडा होण्याची शक्यता असल्याने कृषी आयुक्तालयाने ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन बियाणे ग्रामपातळीवरच उपलब्ध करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.
कृषी विभागामार्फत गावोगावी माहिती देऊन ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातुन सोयाबीन बियाणे प्रक्षेत्र भेटी, काढणी, मळणी, साठवणुकबाबत उत्पादक शेतकरी यांचेशी समन्वय आदी माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. तरी शेतकरी बांधवानी ग्रामबिजोत्पानातुन स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पुढील खरीप हंगामासाठी साठवणूक करुन ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.