नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या अतिरिक्त भूसंपादन केलेल्या जमिनीची सरळ खरेदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
डॉ.भारुड यांच्या उपस्थितीत जमीन खरेदीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, सरकारी अभियोक्ता सुशिल पंडीत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर उपस्थित होते. सरळ खरेदी प्रक्रीयेसाठी साधारण सव्वा कोटीचा निधी अपेक्षित असून 90 लाख रुपये संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून दिले आहे. उर्वरीत रक्कम तातडीने उपब्ध करून देण्याचे निर्देशही डॉ.भारुड यांनी दिले.
सरळ खरेदी प्रक्रीयेमुळे खरेदी प्रक्रीया लवकर होऊन शेतकऱ्यांना शासकीय दराच्या पाचपट रक्कम प्राप्त होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांची रक्कमदेखील लवकर मिळणार आहे.
सारंगखेडा प्रकल्पांतर्गत टेंभा, कमखेडा आणि तोरखेडा येथील 16 शेतकऱ्यांच्या 6.90 हेक्टर जमिनीचे अतिरिक्त भूसंपादन करण्यात आले होते. 2006 पासून जमीन खरेदी प्रक्रीयेचे प्रकरण प्रलंबित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळावा यासाठी लवकर खरेदी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते.