नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूकीचे स्थगित झालेले कामकाज 18 जानेवारी पासून सुरु करण्याचे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण पुणे यांनी आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सहकारी संस्थाचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर होता त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेला होता. अशा सर्व सहकारी संस्थाच्या तसेच ज्या संस्थेची निवडणूक मुदत संपलेली आहे अशा संस्थेच्या निवडणूकीसाठी कामकाज सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 441 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र असून निवडणुकीचा कृती आराखडा व नियोजन तयार करण्यात आले आहे. प्रथम टप्प्यात कोविड -19 मुळे स्थगित झालेल्या सहकारी संस्थाचे स्थगितीच्या टप्प्यापासून निवडणूकीचे कामकाज सुरु करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
कोविड-19 मुळे निवडणुक स्थगित झालेल्या संस्थांनी व संस्थेच्या सभासदानी निवडणुक घेण्यासाठी तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार, नवापुर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव व जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क साधून निवडणूक घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. काही अडचणी असल्यास निवडणूक कक्ष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, खोली क्रमांक 228, नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210023) वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रताप पाडवी यांनी केले आहे