नंदुरबार – ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मुळ आदेशात करण्यात आलेली सुधारणा लक्षात घेता जिल्ह्यातील सलून दुकाने, ब्युटी पार्लर आणि बार्बर शॉप सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशान्वये परवानगी दिली आहे.
या प्रकारच्या दुकानात केवळ केस कापणे, हेअर डाईंग, वॅक्सींग आणि थ्रेडींग इत्यादी सेवांना परवानगी असेल. त्वचेसंबंधीत सेवांना परवानगी असणार नाही. याबाबत ग्राहकांना दिसेल असे फलक दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत.
दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी आणि कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधानांच्या वापरासह ग्लोव्हज, ॲप्रोन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना सेवा दिल्यानंतर सर्व दुकानातील खुर्च्या निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. दुकानातील सामाईक भाग व फ्लोअरचे दर दोन दिवसांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
एकदाच उपयोगात येणारे (डिस्पोजेबल) टॉवेल किंवा नॅपकीनचा उपयोग ग्राहकांसाठी करणे आणि सेवा देण्यापूर्वी व सेवा दिल्यानंतर साधनांचे (नॉन डिस्पोजेबल) निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. या सर्व सुचना दुकानात ठळक अक्षरात लावण्यात याव्यात. आदेशाचा भंग झाल्यास संबंधिताविरुद्ध चौकशी अंती दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश नंदुरबार जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा क्षेत्राकरिता लागू राहील.