अहमदनगर :- संपुर्ण राज्यात डिजिटल स्कुल संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अहोरात्र झटणारे जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक श्री संदिप गुंड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांच्या शाळेला इन्ट्रॅकटिव्ह ऍक्टिव्हिटी टेबल भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवीन साधन उपलब्ध करून दिले आहे.
गेल्या आठ- दहा वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल स्कुल ही संकल्पना राबविली जात आहे. शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तुलनेत अत्याधुनिक साहित्याचा वापर करून अध्यापन झाले पाहिजे, या विचाराने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीच पुढाकार घेऊन प्रयत्न सुरू केले. ठाणे जिल्ह्यातील पाष्टेपाडा या शाळेतील शिक्षक श्री संदीप गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना वरिष्ठांना समजाऊन दिल्यानंतर व प्रशासनाने त्यास अनुमती दिल्यानंतर सम्पूर्ण राज्यात डिजिटल लर्निंग प्रक्रिया सुरु झाली. अनेक शिक्षकांनी चक्क पदरमोड करत आपल्या शाळा डिजिटलाईज केल्या. या सर्व माध्यमातून संदिप गुंड व त्यांची टिम राज्यभरातील शिक्षकांसाठी आदर्श ठरली. या शिक्षकाने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि स्वतःच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण अपंग केंद्र टाकळी ढोकेश्वर, ता .पारनेर जि. अहमदनगर या दिव्यांग मुलांच्या शाळेस ते चेअरमन असलेल्या दीप फाउंडेशनच्या वतीने इन्ट्रॅकटिव्ह ऍक्टिव्हिटी टेबल भेट दिला. नॉर्मल विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विदयार्थ्यांची अध्ययन गती वाढविण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. या विचारप्रवाहातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन मर्यादा लक्षात घेऊन दीप फाउंडेशने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी खास बनविलेला हा टेबल निश्चितच विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास गुंड यांनी व्यक्त केला. संदीप गुंड हे संस्थापक अध्यक्ष, दीप फाऊंडेशन, सल्लागार, ऑपरेशन डिजिटल बोर्ड भारत सरकार या पदांवर कार्यरत असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. तर महाराष्ट्रातील डिजिटल स्कुल संकल्पनेचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.