नंदुरबार – लहानपणी वडिलांना कष्ट करतांना तीने पाहिलेले…कष्ट करूनही पदरात फारसे येत नव्हते….तेव्हा केलेला निश्चय तीने अजूनही कायम ठेवलेला….चितवी येथील कृषी सहायक उर्मिला गावीत कष्टकरी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे म्हणून आजही त्याच निश्चयाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहे.
उर्मिला यांच्याकडे वागदी आणि देवलीपाडा गावची जबाबदारी देखील आहे. शिक्षण कृषि पदविका बारावीपर्यंत झाले असूनही त्यांनी ज्ञानार्जन सोडले नाही. शेतीविषयक पुस्तके, मासिके आवर्जुन वाचत त्या शेतीतील बदलाविषयी जाणून घेतात. नव्या गोष्टींचे प्रशिक्षण घेणेही त्यांना आवडते. म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती सोप्या पद्धतीने देता येते.
सकाळी 8.30 वाजता त्या घरातील कामे आटोपून बाहेर पडतात. दिवसभर तिन्ही गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तालुका कार्यालयालाही काही वेळ भेट असते. शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या शेतात जावून पिकांविषयी माहिती देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, नव्या योजनांची माहिती देणे यात त्यांचा दिवस जातो. सायंकाळी घरी जावून घरची कामे पूर्ण करणे हा त्यांचा दिनक्रम असतो.
उर्मिला जेव्हा 2018 ला गावात चितवी गावात रुजू झाल्या तेव्हा बागायत क्षेत्र 55 हेक्टर होते, आता ते 85 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. शेतकरी पारंपरिक शेती सोडून नव्या तंत्राचा वापर करू लागले आहेत. त्यासाठी त्यांना शासनाच्या नव्या योजनांची माहिती देण्याचे काम त्या करतात. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती केल्याने कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने निंबोळी अर्क तयार करणे, गावराण पद्धतीने दशपर्णी तयार करण्याची प्रात्यक्षिके घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविले आहे.
हवामानानुसार पीक घेण्याची सवय त्यांनी शेतकऱ्यांना लावली. कृषी विद्यापीठाच्या मदतीने अधिक उत्पन्न देणारे बियाणे शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी ’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि पेरणी यंत्राचा लाभ दिला. हवामान आधारीत पीक पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना दिली. पूर्वी पामरीने पेरणी करणारे शेतकरी आता ट्रॅक्टरने पेरणी करतात.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी त्या सतत शेतकऱ्यांशी संवाद साधतात. पीक प्रात्यक्षिके, सौर पंपाचा उपयोग, मधुमक्षिका पालन आदी घटक यशस्वीपणे राबविण्यात त्यांचे योगदान आहे. शेडनेट, भाजीपाला उत्पादनात मल्चिंग पेपरचा उपयोग, ऊसाची पट्टापद्धतीने लागवड, आंतरपिक आले आदींबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
‘विकेल ते पिकेल’’ योजनेअंतर्गत इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनाला चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासाठी वर्षातून 10 शेतीशाळांचे आयोजन करतात. हरभरासाठी देखील 10 शेतीशाळा घेतल्या जातात. कृषी विभागामार्फत हरभऱ्याचे मोफत बियाणेदेखील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्याचे कामही त्या करीत आहेत. या भागातील शेतकरी संपन्न व्हावा आणि त्याने नवे तंत्र स्विकारावे या दिशेने त्या करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे.
उर्मिला गावीत- महिला म्हणून कधीही अडचण आली नाही. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळते. येत्या काळात मल्चिंग पेपरचा उपयोग आणि सूक्ष्म सिंचनाकडे शेतकऱ्यांना वळवायचे आहे. शेतात चांगले पीक पाहून होणारा आनंद मिळत असल्याने कष्ट वाटत नाही.
बापू गावीत, तालुका कृषी अधिकारी नवापूर- उर्मिला गावीत यांना शेतीशाळा उपक्रम उत्तमरितीने राबविला आहे. त्यामुळे गावातील शेतकरी नव्या तंत्राकडे वळत आहेत. हळद आणि मसाला पिकांच्या वाढीसाठीदेखील त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.