नंदुरबार (जिमाका वृत्त): दहावी व बारावी हा उदयोन्मुख युवा पिढीच्या भवितव्याचा पाया असून त्यासाठी विद्यार्थी व बेरोजगार युवक, पालकांना शासन आपल्या दारी या मोहिमेचा भाग म्हणून मोफत समुपदेशन मेळाव्याचे आज (शनिवार, १३ मे २०२३ )आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्धटन करण्यात येणार आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यावतीने हा रोजगार मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्धटन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी, पालक, बेरोजगार तरूणांना मोफत सहभागी होता येणार आहे.
या विषयांवर मिळणार मोफत मार्गदर्शन
या मेळाव्यात संवाद कौशल्ये, १० वी १२ वी नंतरच्या संधी, कौशल्य विकास विभागाच्या योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व योजना, व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया व शिकाऊ कारागिर योजना, शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
हे आहेत वक्ते
या मेळाव्यात गिरीश बडगुजर, प्रा. रविकिरण पाटकरी, एस. बी. जाधव, निलेश गायकवाड, गोपाळ महाजन, प्रमोद महाले, रणजित गवांदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
विद्यार्थी व बेरोजगारांनी सहभागी व्हावे
दहावी, बारावी हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया असून बहुतांश मुलांना दहावी, बारावी नंतर काय करावे, याबाबत विविध प्रकारचे प्रश्न असतात. नेमके काय, कसे, कुठे, कशासाठी अशा प्रश्नांचा संभ्रम मनात असतो. तसेच शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधी कोणकोणत्या व कशा कुठे आहेत याबाबतचे मार्गदर्शन वेळीच मिळाले तर बेरोजगारांनाही भविष्याची दिशा निश्चित कराता येते. त्यामुळे या मोफत समुपदेशन मेळाव्याचा लाभ विद्यार्थी व तरूणांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील यांनी केले आहे.