नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एप्रिल 2022 पासून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिक ,कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे विना हेल्मेट दूचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट तपासणी मोहिम घेण्यात येणार असून या नियमाचे पालन न केल्यास मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार दूचाकी चालकास तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींविरुध्द प्रत्येकी 500 रुपये दंड व अनुज्ञप्ती (लायसन्स) 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दूचाकी वाहनांचा वापर करताना हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.