नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  :  शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शाळेत न येणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांचे समुपदेशन करावे. स्थलांतरीत मुलांची नोंद करून अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  शाळाबाह्य, स्थलांतरीत, अनियमित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले,  वीटभट्टी आणि ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती संकलीत करण्यात यावी. आश्रमशाळेत न आलेल्या मुलांची नोंद घेऊन त्यांच्या पालकांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा. स्थलांतरीत पालकांची नोंद घ्यावी. त्यांच्याशी संपर्क करून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत समुपदेशन करावे. 50 टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील  प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ते म्हणाले, दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही. या भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे.

शाळा वर्गखोल्यांची कामे 15 मार्चपर्यंत पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी आवश्यक वर्गखोल्यांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावे. दुर्गम भागात 50 पेक्षा अधिक विद्यार्थी असूनही वर्गखोली नसलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात यावे. शाळेच्या इमारती आणि परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.