नंदुरबार (जिमाका वृत्त): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अल्प व्याजदरात 2023-24 या वर्षात कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हि. न. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेत स्वयंसहाय्यता बचतगट, प्रवासी, मालवाहू वाहन व ऑटोरिक्षा व्यवसाय यासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण व शहरी भागासाठी रु. 3 लाख मर्यादेत उत्पन्नाचा दाखला, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक, व्यवसाय प्रकल्प अहवाल, बँक पासबुकची छायाकिंत प्रत, सातबारा, घर नमुना आठ, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रचलित नियमानुसार आवश्यक कागदपत्रे, एक जामीनदार आदि कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.
अर्ज भरण्यासाठी https://mahashabari.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज वितरण प्रणालीद्वारे स्वत:चे खाते तयार करुन, संपूर्ण माहिती व आवश्यक ती कागदपत्रे जोडावित. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रीत प्रत कागदपत्रांसह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा कार्यालयास 5 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा करावी. असेही प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. पाटील यांनी कळविले आले.