नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2021 या दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या युवकांसाठी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नवमतदारांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान वंचित मतदार आपली नाव नोंदणी अर्ज क्र. 6 भरुन करु शकतील. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना आपल्या नावामध्ये, वय, पत्ता इतर काही त्रुटी असतील बीएलओकडे कागदपत्रे देऊन स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या मतदार यादीतील नोंदी, फोटो, तपासणी करुन आवश्यकता असल्यास अर्ज क्र. 8 भरुन सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरुन वगळणी करता येतील. नमुना अर्ज क्र. 6 , 7 , 8 व 8 अ www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा मोबाईद्वारेही सादर करता येतील.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जातील. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार व रविवारी विशेष मोहिम राबविण्यात येईल. 5 जानेवारी 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. त्यानंतर 14 जानेवारी 2021 रोजी प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी करण्याकरीता आयोगाची परवानगी घेतली जाईल व 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.