नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात 85 हजार 768 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
8 ते 11 डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 21 हजार 986 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 6 हजार 767 व्यक्तींनी पहिला डोस तर 7 हजार 204 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 45 वर्षावरील 3 हजार 966 व्यक्तींनी पहिला तर 3 हजार 973 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 3 फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा, तर 63 गर्भवती मातांनी पहिला तर 5 गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 4 दिव्यांगांनी पहिला तर 1 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
9 डिसेंबर रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात 25 हजार 119 व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 7 हजार 558 व्यक्तींनी पहिला डोस तर 6 हजार 928 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 45 वर्षावरील 5 हजार 487 व्यक्तींनी पहिला तर 5 हजार 74 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 2 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. 1 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला तर 17 फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा डोस घेतला. तसेच 46 गर्भवती मातांनी पहिला तर 1 गर्भवती मातेनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 3 दिव्यांगांनी पहिला डोस तर 2 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
10 डिसेंबर रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात 24 हजार 26 व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 7 हजार 137 व्यक्तींनी पहिला डोस, तर 7 हजार 213 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 5 हजार 227 व्यक्तींनी पहिला, तर 4 हजार 343 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 5 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा तर 76 गर्भवती मातांनी पहिला तर 13 गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 11 दिव्यांगांनी पहिला डोस तर 1 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
तर 11 डिसेंबर रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात 14 हजार 637 व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44 वयोगटातील 4 हजार 410 व्यक्तींनी पहिला डोस तर 3 हजार 811 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 4 हजार 65 व्यक्तींनी पहिला तर 2 हजार 269 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. 72 गर्भवती मातांनी पहिला तर 6 गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 4 दिव्यांगांनी पहिला डोस घेतला आहे.
जिल्ह्यात 14 लाख 20 हजार 200 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 9 लाख 75 हजार 143 नागरिकांनी (68.66 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 5 लाख 30 हजार 767 नागरिकांनी (37.37) दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून 15 लाख 5 हजार 910 डोस जिल्ह्यात देण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने लसीकरणासाठी विशेष बूथ कार्यान्वित केले होते. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी मदतनिस कार्यान्वित केले होते. आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात आली.
लसीकरण मोहिमेचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. नंदुरबारसाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ-ठुबे, नवापूर तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तळोदा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रकाश थविल, अक्कलकुवा तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, अक्राणी तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार तर शहादा तालुक्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सतगीर यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जनजागृती करून ही मोहिम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. याशिवाय विविध शासकीय विभागांना लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्हावासियांना आवाहन केले होते. जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वत: तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लसीकरण केंद्रांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यात जनजागृती करून लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले होते. या आवाहनास नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोविडचा संसर्ग कमी होत असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांनी ठेवून ज्या नागरीकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला नसेल त्यांनी पहिला तर ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. नागरिकांनी विशेष लसीकरण शिबीरात जसा प्रतिसाद दिला त्याचप्रकारे अद्यापही ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.