नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत आदिवासी स्वयंसहाय्यता पुरुष व महिला बचत गटास पोल्ट्री- फार्म व्यवसायासाठी तसेच आदिवासी स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करण्यासाठी ( प्रती युनिट 10 शेळी व 1 बोकड) अर्ज मागविण्यात आले आहेत.

स्वयंसहायता बचत गट तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील असावा. गटाची महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान‍ किंवा पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी असावी. परीपूर्ण भरलेले अर्ज हे कार्यालयीन वेळेत 31 जानेवारी 2021 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि.नंदुरबार येथे सादर करण्यात यावेत. जास्तीत जास्त गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे.