नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 : शासकीय आश्रमशाळा अलगीकरण कक्ष वाघाळे येथे गावातील 53 कोरोना बाधित व्यक्तींवर उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. या कक्षासाठी ग्रामपंचायतीचे चांगले सहकार्य लाभले आहे.
वाघाळे ग्रामपंचायत हद्दीत विशेष पथकाद्वारे 407 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 73 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि गट विकास अधिकारी अशोक पटाईत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने गावातील आश्रमशाळेत अलगीकरण कक्ष तयार करून याठिकाणी 53 कोरोना बाधित व्यक्तींना उपचारासाठी दाखल केले.
एकलव्य अलगीकरण कक्षात 6 तर खाजगी रुग्णालयात 4 व्यक्तींवर उपचार करण्यात येत आहेत. 10 बाधितांचे शेतातील जागेत स्वतंत्रपणे अलगीकरण करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करून त्यांना औषधे पुरविण्यात आली आहेत. रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात आल्या आहेत.
अलगीकरण कक्षातील सुविधेसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती व ग्राम रक्षक दल सदस्य यांचे सहकार्य लाभले. कक्षात दाखल बाधित व्यक्तींची प्रकृती सामान्य असून रुग्णास त्रास जाणवल्यास तात्काळ पुढील उपाय योजना करण्याचे विलगीकरण कक्ष प्रमुख व ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे, अशी माहिती तहसीलदार थोरात यांनी दिली.
अलगीकरण कक्षातील व्यक्तींसाठी जि.प.सदस्य देवमन पवार यांनी पाच कॅरेट अंडी कक्ष व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली. यावेळी पं. स. सदस्य संतोष साबळे, कमलेश महाले, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे, ग्रा.वि. अधिकारी भरत निकुंभे आदी उपस्थित होते.