नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या ठिकाणी कामाची माहिती देणारे फलक लावावेत. मजुरांना मजुरी निर्धारित वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. अपुर्ण असलेली कामे ही या आठवड्यापर्यंत पुर्ण करावीत. ही कामे नियमानुसार तसेच दर्जेदार, असावीत असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उपायुक्त (रोहयो) डॉ.अर्जुन चिखले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगाच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.पी.भागेश्वर आदी उपस्थित होते.
यावेळी मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या सीसीटी, कम्पार्टमेंट बंडींग, फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध, इंदिरा आवास योजना, सिंचन विहीर अशा कामांचा आणि विविध विभागाचा कामाचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामे वरिष्ठाशी समन्वय साधून त्वरीत पुर्ण करावीत अशा सूचना डॉ.चिखले यांनी दिल्या. बैठकीस तालुक्यातील सहायक कार्यक्रम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपआयुक्तानी केली रोहयो कामाची पाहणी
उपआयुक्त डॉ.अर्जुन चिखले यांनी ग्रामपंचायत घोटाणे येथे सुरू असलेल्या सिंचन विहीर, तसेच ग्रामपंचायत आसाने येथे सुरु असलेले सलग समतल चर खोदणे या कामाची पाहणी केली. यावेळी वनक्षेत्रपाल एम के रघुवंशी ,वनपाल भाबड, सरपंच चंद्रकांत पाटील,पी.टी.ओ नितीन पाटील, संदीप वाडीले, ग्राम रोजगार सेवक सागर पाटील उपस्थित होते..