नंदुरबार ( जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य नविन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागासाठी संस्थांनी १५ ऑगस्ट व युवकांनी त्यांच्या संबंधीत संस्थेमार्फत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
यात सहभागी होण्याकरीता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येणार आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेवून त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साकारण्यासाठी संभाव्य पाठबळ देण्याचा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्था व विद्यार्थी या इनोव्हेशन चॅलेंजकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेची स्थापना करण्यांत आली आहे. महाराष्ट्र राज्यात नाविन्यता परिषदेमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. देशातील युवकांमधील सृजनशिलता विकसीत करुन त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातुन नवनिर्मिती करणे. त्याकरीता पोषक वातावरण तयार करणे, नवनवीन कार्यपद्धती, निर्मिती पध्दती, वितरण प्रणाली या बाबींच्या अंतर्भवासह गमिमान व संवेनदशील पद्धतीने व्यवस्थापन, शासन व्यवस्था निर्माण करणे व त्या माध्यमातुन सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्याथ्यांनी या चॅलेंज मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे सहायक आयुक्त श्री. रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.