नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 11 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित एकूण 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे.
तहसीलदार मंगळवार 15 डिसेंबर 2020 रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करतील. नमुना अ अ मध्ये नमूद ठिकाणी 23 ते 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ( 25,26 व 27 डिसेंबर 2020 ची सार्वत्रिक सुट्टी वगळून ) नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येईल.
गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल.
सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 .30 वाजेपर्यंत मतदान होईल. तर सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार असून निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना 21 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
ग्रामपंचायत निवडणूकीकरीता उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र सादर करतांना निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) बालाजी क्षीरसागर यांनी कळविले आहे.