*नंदुरबार– (जगदीश ठाकुर)*
नंदुरबार जिल्हा परिषद व 6 पंचायत समितीसाठी काल दि. 7 जानेवारीला मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी साडे सात वाजेपासून सुरू झालेल्या मतदानासाठी सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदारांची अल्प गर्दी दिसून आली. दुपारनंतर मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोहोचल्याने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नंदुरबार जिल्हाभरात 53.29 टक्के इतके मतदान झाले होते.
थंडीचा कडाका असल्यानं सकाळच्या सुमारास मतदारांनी घराबाहेर निघणे टाळले. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी कमी होती. 10 वाजेनंतर केंद्रांवर मतदार येऊ लागल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आणि दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानासाठी येणाऱ्या वृद्ध व दिव्यांग मतदारांना विद्यार्थ्यांसह तरुणांनी मदत कार्य करीत केंद्रापर्यंत पोहोचवले. जिल्ह्यातील गावांमध्ये मतदानासाठी एकच लगबग दिसून आली. लोकप्रतिनिधींनीही देखील आपापल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजाविला. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या 112 गणांसाठी जिल्ह्यात 1 हजार 229 मतदान केंद्र असल्याने अनेक मतदारांनी मतदान केले. अनेकांनी सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करीत मतदारांना आपणही मतदान करा, असे आवाहन केले. दिवसभर ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मिनी मंत्रालयासाठी लोकशाहीचा महोत्सव भरल्याचे दिसून आले. राजकीय नेते दिवसभर गट, गणांमध्ये ठाण मांडून होते. काही किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजता दरम्यान 9. 28 टक्के इतके मतदान जिल्ह्याभरात झाले होते. त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत 28.87 टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्याने दुपारी दिड वाजे दरम्यान टक्केवारी एकूण 39.43 टक्क्यांवर पोहोचली. अनेक मतदार मतदानासाठी केंद्रांवर पोहोचल्याने दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्याभरात सरासरी 53.29 टक्के इतके मतदान झाले. दुपारी चार नंतर मतदारांचा ओघ वाढल्याने सायंकाळी साडेपाच नंतर मतदानाची वेळ संपल्यावरही मतदारांच्या रांगा असल्यामुळे उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याचे दिसून आले. नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणातील 415 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार राजाने मतदान यंत्रात बंद केलं असून या मिनी मंत्रालयाच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. उद्या दि.8 जानेवारी रोजी मतदान प्रक्रियेतुन महाफैसला होणार असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.